महाराष्ट्र : प्रशासकीय रचना 


 प्रास्ताविक:

    महाराष्ट्राचा भूगोल या विषयांतर्गतमहाराष्ट्र राज्यातील प्रशासकीय रचना या घटकाविषयी अभ्यास करणार आहोत. प्रशासकिय रचना या घटकामध्येमहाराष्ट्र राज्यातील प्रशासकीय विभाग, प्रादेशिक विभाग, महाराष्ट्रातील जिल्हे आणि तालुके तसेच ग्रामीण स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्था यांचा अभ्यास करणार आहोत.

    1 मे  1960 रोजी, महाराष्ट्र राज्यात, मुंबई विभाग, पुणे विभाग, औरंगाबाद विभाग आणि नागपूर विभाग असे ४ प्रशासकीय विभाग, २६ जिल्हे आणि २२९ तालुके होते. २०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात सध्या, मुंबई म्हणजेच कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद,  अमरावती व नागपूर असे सहा प्रशासकीय विभाग, ३६ जिल्हे आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील कुर्ला, अंधेरी आणि बोरीवली या ०३ नागरी तालुक्यासह ३५८ तालुके आहेत. याशिवाय महाराष्ट्रात ३४ जिल्हापरिषद, ३५१ पंचायत समिती आणि २८८१३ ग्रामपंचायती इत्यादी ग्रामीण स्वराज्य संस्था आहेत. नागरी स्वराज्य संस्थाचा विचार करता, महाराष्ट्र राज्यात एकूण  27 महानगरपालिका, २३३ नगर परिषद, १२६ नगर पंचायत आणि ०७ कटक मंडळे आहेत.  त्याचबरोबर वस्ती असलेली ४०,९५९ आणि वस्ती नसलेली २,७०६ अशी एकूण ४३,६६५ खेडी आहेत. याशिवाय, महाराष्ट्र राज्यात एकूण ५३४ शहरे आणि १७ शहर  संकुले असून एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली ४४ शहरे आहेत.  



महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग: 

    १ में १९६० रोजी,  महाराष्ट्रात एकूण  कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर असे 04 प्रशासकीय विभाग होते.  सध्यस्थितीत प्रशासकीय सोयीसाठी महाराष्ट्राची विभागणी कोंकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या ६ प्रशासकीय विभागात करण्यात आली आहे.



 महाराष्ट्र: प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ: 

    औरंगाबाद प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त असून सर्वात कमी कोकण विभागाचे क्षेत्रफळ आहे. औरंगाबाद प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ २१.०६ टक्के असून कोंकण प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ ९.९८ टक्के आहे. क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, कोकण असा आहे.



कोकण प्रशासकीय विभाग: 

    मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या ०७ जिल्ह्यांचा समावेश कोकण प्रशासकीय विभागात होतो.कोंकण प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ ३०,७२८ चौ. कि.मी असून महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या ९.९८ % इतके आहे. कोंकण प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा रत्नागिरी असून सर्वात लहान जिल्हा मुबई शहर आहे. 



पुणे प्रशासकीय विभाग: 

    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या ०५ जिल्ह्यांचा समावेश पुणे  प्रशासकीय विभागात होतो. पुणे प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ  ५७२७५ चौ. कि.मी असून महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या १८.६२ % इतके आहे. पुणे प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा पुणे असून सर्वात लहान जिल्हा कोल्हापूर आहे. 



नाशिक प्रशासकीय विभाग: 

    नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर या ०५ जिल्ह्यांचा समावेश नाशिक प्रशासकीय विभागात होतो. नाशिक प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ ५७४९३ चौ. कि.मी असून महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या १८.६९ % इतके आहे. नाशिक  प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर असून सर्वात लहान जिल्हा नंदुरबार आहे. 



 औरंगाबाद प्रशासकीय विभाग: 

    औरंगाबाद, परभणी, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली या ०८ जिल्ह्यांचा समावेश औरंगाबाद प्रशासकीय  विभागात होतो. औरंगाबाद प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ ६४८१३ चौ. कि.मी असून महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या २१.०६ % इतके आहे. औरंगाबाद प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा बीड असून सर्वात लहान जिल्हा हिंगोली आहे. 



अमरावती प्रशासकीय विभाग: 

    अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, वाशीम या ०५ जिल्ह्यांचा समावेश अमरावती प्रशासकीय  विभागात होतो. अमरावती प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ ४६०२७ चौ. कि.मी असून महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या १४.९५ % इतके आहे. अमरावती प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा यवतमाळ असून सर्वात लहान जिल्हा वाशिम आहे. 



नागपूर प्रशासकीय विभाग: 

    नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ०६ जिल्ह्यांचा समावेश नागपूर प्रशासकीय विभागात होतो. नागपूर प्रशासकीय विभागाचे ५१,३७७ चौ. कि.मी असून महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या १६.७० % इतके आहे. नागपूर प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा गडचिरोली असून सर्वात लहान जिल्हा भंडारा आहे. 



महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग: एकूण जिल्हे आणि तालुके

    औरंगाबाद प्रशासकीय विभागात सर्वात जास्त ०८ जिल्हे असून कोकण प्रशासकीय विभागात 07 जिल्हे, नागपूर प्रशासकीय विभागात 06 जिल्हे, पुणे प्रशासकीय विभाग,  नाशिक प्रशासकीय विभाग आणि अमरावती प्रशासकीय  विभागात प्रत्येकी  ०५ जिल्हे आहेत. औरंगाबाद प्रशासकीय विभागात सर्वात जास्त ७६ तालुके असून नागपूर प्रशासकीय विभागात 64 तालुके, पुणे प्रशासकीय विभागात 58 तालुके,  अमरावती प्रशासकीय  विभागात 56 तालुके, नाशिक प्रशासकीय विभागात 54 तालुके आणि सर्वात कमी ५० तालुके  कोकण प्रशासकीय विभागात आहेत.


  

महाराष्ट्र राज्य: प्रादेशिक विभाग: 

    भौगोलिक, ऐतिहासिक, राजकीय आणि सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्रास कोकण, देश, खानदेश, मराठवाडा व विदर्भ अशा पाच प्रमुख प्रादेशिक विभागात विभाजित करण्यात येते.



महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागाचे क्षेत्रफळ: 

    विदर्भ प्रादेशिक विभागांचे  क्षेत्रफळ सर्वात जास्त असून खानदेश प्रादेशिक विभागाचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे. विदर्भ प्रादेशिक विभागाचे क्षेत्रफळ ९७४०४ चौ. कि. मी. असून खानदेश प्रादेशिक विभागाचे क्षेत्रफळ २४९१५ चौ. कि. मी. इतके आहे. क्षेत्रफळानुसार प्रादेशिक विभागाचा उतरता क्रम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि  खानदेश असा आहे.



कोंकण प्रादेशिक विभाग: 

    मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या 07 जिल्ह्यांचा समावेश कोकण विभागात होतो.कोंकण प्रादेशिक विभागाचे क्षेत्रफळ ३०,७२८ चौ. कि.मी असून महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या ९.९८ % इतके आहे. कोंकण प्रादेशिक विभागातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा रत्नागिरी असून सर्वात लहान जिल्हा मुबई शहर आहे.


पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक विभाग:
 
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर या 07 जिल्ह्यांचा समावेश देश किंवा पश्चिम महाराष्ट्र विभागात होतो. देश किंवा पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक विभागाचे क्षेत्रफळ ८९८५३ चौ. कि.मी असून महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या २९.२%  इतके आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक विभागातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर असून सर्वात लहान जिल्हा कोल्हापूर आहे. 



खानदेश प्रादेशिक विभाग: 

    धुळे, नंदुरबार, जळगाव या 03 जिल्ह्यांचा समावेश खानदेश विभागात होतो. खानदेश प्रादेशिक विभागाचे क्षेत्रफळ २४९१५ चौ. कि.मी इतके असून महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या ८.१० %  इतके आहे.  खानदेश प्रादेशिक विभागातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा जळगाव  असून सर्वात लहान जिल्हा नंदुरबार आहे.


 

मराठवाडा प्रादेशिक विभाग: 

    औरंगाबाद, परभणी, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली या 08 जिल्ह्यांचा समावेश मराठवाडा  विभागात होतो. मराठवाडा  विभागाचे क्षेत्रफळ ६४८१३ चौ. कि.मी असून महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या २१.०६ % इतके आहे. मराठवाडा  विभागातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा बीड असून सर्वात लहान जिल्हा हिंगोली आहे. 



विदर्भ प्रादेशिक विभाग: 

    अमरावती प्रशासकीय विभागातील अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, वाशीम हे ०५ जिल्हे आणि नागपूर प्रशासकीय विभागातील  नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे ०६ जिल्हे अशा एकूण  11 जिल्ह्यांचा समावेश विदर्भ  विभागात होतो. विदर्भ प्रादेशिक विभागाचे क्षेत्रफळ ९७४०४  चौ. कि.मी असून महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३१.६५ % इतके आहे. विदर्भ  प्रादेशिक विभागातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा गडचिरोली  असून सर्वात लहान जिल्हा भंडारा  आहे.


महाराष्ट्र प्रादेशिक विभाग: एकूण जिल्हे आणि तालुके: 
विदर्भ प्रादेशिक विभागात सर्वात जास्त ११ जिल्हे असून मराठवाडा प्रादेशिक विभागात ०८ जिल्हे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागात प्रत्येकी ०७ जिल्हे आणि सर्वात कमी ०३ जिल्हे खानदेश प्रादेशिक विभागात आहेत. विदर्भ प्रादेशिक विभागात सर्वात जास्त १२० तालुके असून पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक विभागात ८७ तालुके, मराठवाडा प्रादेशिक विभागात ७६ तालुके, कोकण प्रादेशिक विभागात ५० तालुके तर सर्वात कमी २५ तालुके खानदेश प्रादेशिक विभागात आहेत.  



   महाराष्ट्रातील नवीन जिल्ह्यांची निर्मिती:  

    १ मे १९६० रोजी महाराष्ट्रात जिल्ह्यांची एकूण संख्या २६ होती. त्यानंतर महाराष्ट्रात नवीन १० जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. १ में १९८१ रोजी जिल्ह्यांची संख्या 28 होती. १६ ऑगस्ट १९८२ रोजी जिल्ह्यांची संख्या २९, २६ ऑगस्त १९८२ रोजी जिल्ह्यांची संख्या ३०, ४ ऑक्टोबर १९९० रोजी जिल्ह्यांची संख्या ३१, १  जुलै १९९८ रोजी जिल्ह्यांची ३३, १  में १९९९ रोजी जिल्ह्यांची ३५ आणि १ ऑगस्त २०१४ रोजी जिल्ह्यांची एकूण संख्या ३६ झाली. सध्या  महाराष्ट्रातील जिल्ह्यांची एकूण संख्या ३६ इतकी आहे.



    १ में १९६० रोजी  महाराष्ट्रात एकूण  २६ जिल्हे होते. कोकण विभागातील  मुंबई शहर, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी हे ०४ जिल्हे, पुणे विभागातील  पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे हे ०९ जिल्हे, औरंगाबाद विभगातील  औरंगाबाद, परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड हे ०५ जिल्हे आणि नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, चांदा, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला हे ०८ जिल्हे असे एकूण २६ जिल्हे होते.



    १ मे १९८१ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग व औरंगाबाद जिल्ह्यातून जालना हे जिल्हे वेगळे झाले आणि २ नवीन जिल्ह्यांची निर्मिती होऊन जिल्ह्यांची संख्या 28 झाली.



    १६ ऑगस्ट १९८२ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूर हा २९ वा नवीन जिल्हा निर्माण झाला.



    २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली हा ३० वा नवीन जिल्हा निर्माण झाला.



  १ ऑक्टोबर, १९९० रोजी मुंबई शहर या जिल्ह्यातून ३१ वा मुंबई उपनगर हा जिल्हा निर्माण झाला.



    १ जुलै १९९८ रोजी धुळे  जिल्ह्यातून नंदुरबार आणि अकोला  जिल्ह्यातून वाशिम  असे दोन नवीन जिल्हे निर्माण झाले आणि जिल्ह्यांची संख्या ३३ झाली.



    १ मे १९९९ रोजी भंडारा जिल्ह्यातून गोंदिया व परभणी जिल्ह्यातून हिंगोली असे दोन नवीन जिल्हे निर्माण झाले आणि जिल्ह्यांची संख्या ३५ झाली.



    १ ऑगस्ट, २०१४ रोजी ठाणे जिल्ह्यातून पालघर हा ३६ वा जिल्हा निर्माण झालेला आहे.



    अशाप्रकारे महाराष्ट्रात सध्या कोकण प्रशासकीय विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर हे ०७ जिल्हे,  पुणे प्रशासकीय विभागातील  पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर हे  ०५ जिल्हे, नाशिक प्रशासकीय विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार हे ०५ जिल्हे,  औरंगाबाद  प्रशासकीय विभागातील  औरंगाबाद, परभणी,जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली हे  ०८ जिल्हे, अमरावती प्रशासकीय विभागातील  अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, वाशीम हे  ०५  जिल्हे  तसेच नागपूर प्रशासकीय विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे ०६ जिल्हे असे  एकूण ३६ जिल्हे सध्या महाराष्ट्रात आहेत.



   क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील जिल्हे: 

  अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त असून क्षेत्रफळानुसार  सर्वात मोठे जिल्हे उतरत्या क्रमाने असे आहेत. अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि  गडचिरोली. मुंबई शहर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी असून  क्षेत्रफळानुसार सर्वात लहान शेवटचे पाच जिल्हे असे आहेत.:-मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे, हिंगोली



  महाराष्ट्रातील प्रशासकीय व प्रादेशिक विभागानुसार जिल्हे: 

  प्रशासकीय विभागानुसार सर्वात जास्त ८  जिल्हे  औरंगाबाद विभागात आहेत. प्रादेशिक विभागानुसार सर्वात जास्त ११ जिल्हे  विदर्भ  विभागात असून सर्वात कमी ३ जिल्हे खानदेश  विभागात आहेत.



महाराष्ट्रातील तालुके: 

महाराष्ट्रात ३५५ ग्रामीण तालुके आणि  ३ नागरी तालुके असे एकूण ३५८ तालुके आहेत.



प्रशासकीय व प्रादेशिक विभागानुसार तालुके: 

    प्रशासकीय विभागानुसार सर्वात जास्त ७६ तालुके औरंगाबाद प्रशासकीय विभागात असून सर्वात कमी 50 तालुके कोंकण प्रशासकीय विभागात आहेत. प्रादेशिक विभागानुसार सर्वात जास्त १२० तालुके विदर्भ  विभागात असून सर्वात कमी २५  तालुके खानदेश  विभागात आहेत.




कोंकण प्रशासकीय विभागातील जिल्हानिहाय तालुके: 

    कोकण प्रशासकीय विभागात सर्वात जास्त १५ तालुके रायगड जिल्ह्यात असून मुंबई शहर  या जिल्ह्यात एकही तालुका नाही. कोकण प्रशासकीय विभागातील तालुक्यांचा  उतरता क्रम: रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर असा आहे.

    कोकण प्रशासकीय विभागातील जिल्हानिहाय तालुक्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

कोकण विभाग (जिल्हे:  ०७, तालुके: ५०)

· पालघर जिल्हा (०८ तालुके): तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर

ठा ठाणे जिल्हा (०७ तालुके) : ठाणे, भिवंडी, शहापूर, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड

· रायगड जिल्हा (१५ तालुके) : उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, अलिबाग, मुरुड, रोहा, सुधागड, माणगाव, तळा, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर

· रत्नागिरी जिल्हा (०९ तालुके): मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर

·  मुंबई उपनगर जिल्हा (०३ तालुके) : अंधेरी, बोरीवली,  कुर्ला

·  मुंबई शहर जिल्हा (०० तालुके): एकही नाही

· सिंधुदुर्ग जिल्हा (०८ तालुके): देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, वेंगुर्ला, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग

 


पुणे प्रशासकीय विभागातील जिल्हानिहाय तालुके: 

    पुणे प्रशासकीय विभागात सर्वात जास्त १४  तालुके पुणे  जिल्ह्यात असून सांगली जिल्ह्यात सर्वात कमी १० तालुके आहेत. पुणे  प्रशासकीय विभागातील तालुक्यांचा  उतरता क्रम: पुणे कोल्हापूर - सोलापूर सातारा सांगली असा आहे. पुणे प्रशासकीय विभागातील जिल्हानिहाय तालुक्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.


पुणे  विभाग (जिल्हे: ०५ , तालुके: ५८)

पुणे जिल्हा (१४ तालुके): जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, मावळ, मुळशी, हवेली, पुणे शहर, दौंड, पुरंदर, वेल्हे, भोर, बारामती, इंदापूर

सोलापूर जिल्हा (११ तालुके): करमाळा, माढा, बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट

सातारा जिल्हा (११ तालुके): महाबळेश्वर, वाई, खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, सातारा, जावळी, पाटण, कराड

कोल्हापूर जिल्हा (१२ तालुके): शाहुवाडी, पन्हाळा, हातकनंगले,शिरोळ ,करवीर ,गगनबावडा, राधानगरी, कागल, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज,चंदगड

सांगली जिल्हा (१० तालुके): शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव, मिरज, कवठे महांकाळ, जत,

 


नाशिक प्रशासकीय विभागातील जिल्हानिहाय तालुके: 

नाशिक   प्रशासकीय विभागात सर्वात जास्त १५  तालुके जळगाव व नाशिक  जिल्ह्यात असून धुळे जिल्ह्यात सर्वात कमी ०४ तालुके आहेत. नाशिक   प्रशासकीय विभागातील तालुक्यांचा  उतरता क्रम: जळगाव नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळे असा आहे. नाशिक  प्रशासकीय विभागातील जिल्हानिहाय तालुक्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

नाशिक  विभाग (जिल्हे:५, तालुके:५४)

नंदुरबार जिल्हा (०६ तालुके): अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा, शहादा, नंदुरबार, नवापुर

धुळे जिल्हा (०४ तालुके): शिरपूर, शिंदखेडा, साक्री, धुळे

जळगाव जिल्हा (१५ तालुके): चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, जळगाव, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, पारोळा, भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर

नाशिक जिल्हा (१५ तालुके): सुरगणा, कळवण, देवळा, बागलाण, मालेगाव, नांदगाव, चांदवड, दिंडोरी, पेठ, त्रिंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी, सिन्नर, निफाड, येवला

अहमदनगर जिल्हा (१४ तालुके): अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, नगर, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड




औरंगाबाद  प्रशासकीय विभागातील जिल्हानिहाय तालुके: 

    औरंगाबाद  प्रशासकीय विभागात सर्वात जास्त १६  तालुके नांदेड जिल्ह्यात असून सर्वात कमी ०५ तालुके हिंगोली  जिल्ह्यात आहेत. औरंगाबाद  प्रशासकीय विभागातील तालुक्यांचा  उतरता क्रम: नांदेड -बीड-लातूर-परभणी-औरंगाबाद -जालना-उस्मानाबाद-हिंगोली असा आहे. औरंगाबाद   प्रशासकीय विभागातील जिल्हानिहाय तालुक्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

औरंगाबाद विभाग (जिल्हे:८, तालुके:७६)

नांदेड जिल्हा (१६ तालुके):माहूर, किनवट, हिमायतनगर, हदगाव ,अर्धापूर, नांदेड, मुदखेड, भोकर, उमरी, धर्माबाद, बिलोली, नायगाव , लोहा, कंधार, मुखेड, देगलूर

हिंगोली जिल्हा (०५ तालुके): सेनगाव, हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी,वसमत

जालना जिल्हा (०८ तालुके) : भोकरदन, जाफ्राबाद, जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी , परतूर, मंठा

औरंगाबाद जिल्हा (०९ तालुके): कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, औरंगाबाद, खुलताबाद , वैजापूर, गंगाप्पूर, पैठण

बीड जिल्हा (११ तालुके): आष्टी, पाटोदा, शिरूर (कासार), गेवराई, माजलगाव, वडवणी, बीड, केज, धारूर, परळी, आंबेजोगाई

लातूर जिल्हा (१० तालुके):लातूर, रेणापूर, अहमदपूर, जळकोट, चाकूर, शिरूर-अनंतपाळ, औसा, निलंगा , देवणी, उदगीर

उस्मानाबाद जिल्हा (०८ तालुके): परंडा, भूम, वाशी, कळंब, उस्मानाबाद,  तुळजापूर, लोहारा, उमरगा

परभणी जिल्हा (०९ तालुके): सेलू, जिंतूर, परभणी, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा




  अमरावती  प्रशासकीय विभागातील जिल्हानिहाय तालुके: 

    अमरावती  प्रशासकीय विभागात सर्वात जास्त १६  तालुके यवतमाळ  जिल्ह्यात असून सर्वात कमी ०६  तालुके वाशिम  जिल्ह्यात आहेत. अमरावती  प्रशासकीय विभागातील तालुक्यांचा  उतरता क्रम: यवतमाळ- अमरावती बुलढाणा अकोला वाशिम असा आहे.अमरावती  प्रशासकीय विभागातील जिल्हानिहाय तालुक्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

अमरावती विभाग (जिल्हे:५, तालुके:५६)

बुलडाणा जिल्हा (१३ तालुके): जळगाव (जामोद), संग्रामपूर, शेगाव, नांदुरा, मलकापूर, मोताळा, खामगाव, मेहकर, चिखली, बुलडाणा, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार

अकोला जिल्हा (७ तालुके):तेल्हारा, अकोट, बाळापुर, अकोला, मुर्तीजापूर, पातुर, बार्शीटाकळी

वशिम जिल्हा (६ तालुके):मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा, वाशिम, रिसोड

अमरावती जिल्हा (१४ तालुके): धारणी,चिखलदरा,अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदूर बाजार,मोर्शी, वरुड, तिवसा, अमरावती, भातुकली, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वरचांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे

यवतमाळ जिल्हा (१६ तालुके):नेर, बाभूळगाव, कळंब, यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव, आर्णी, घाटंजी, केळापूर, राळेगाव,मारेगाव, झरी जामणी, वणी




नागपूर प्रशासकीय विभागातील जिल्हानिहाय तालुके: 

    नागपूर  प्रशासकीय विभागात सर्वात जास्त १५   तालुके चंद्रपूर  जिल्ह्यात असून सर्वात कमी ०७ तालुके भंडारा  जिल्ह्यात आहेत. नागपूर  प्रशासकीय विभागातील तालुक्यांचा  उतरता क्रम:  चंद्रपूर नागपूर गडचिरोली वर्धा -  गोंदिया भंडारा असा आहे. नागपूर  प्रशासकीय विभागातील जिल्हानिहाय तालुक्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.


नागपूर विभाग: (जिल्हे:०६, तालुके:६४ )

वर्धा जिल्हा (८ तालुके): आष्टी, कारंजा, आर्वी, सेलू, वर्धा, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर

नागपूर जिल्हा (१४ तालुके): नरखेड, काटोल, कळमेश्वर, सावनेर, पारशिवनी, रामटेक, मौदा, कामठी, नागपूर(ग्रामीण), नागपूर (शहर), हिंगणा, उमरेड, कुही, भिवापूर

भंडारा जिल्हा (७ तालुके): तुमसर, मोहाडी, भंडारा, साकोली, लाखनी, पवनी, लाखांदूर

चंद्रपूर जिल्हा (१५ तालुके): वरोरा, चिमूर, नागभिड, ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही, भद्रावती, चंद्रपूर, मुल, पोन्भूर्णा, बल्लारपूरकोरपना, जिवती, राजुरा, गोंड पिंपरी

गोंदिया जिल्हा (८ तालुके): तिरोडा, गोरेगाव, गोंदिया, आमगाव, सालेकसा, सडक-अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, देवरी

गडचिरोली जिल्हा (१२): देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा, कोरची, धानोरा, गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा




तालुक्यांची संख्या समान असणारे जिल्हे:

·        १६ तालुके असलेले नांदेड व यवतमाळ असे ०२ जिल्हे आहेत.

·        १५ तालुके असलेले नाशिक, जळगाव, रायगड, चंद्रपूर असे ०४ जिल्हे आहेत.

·        १४ तालुके असलेले पुणे, नागपूर, अमरावती, अहमदनगर असे ०४ जिल्हे आहेत.

·        १३ तालुके असलेले बुलढाणा असा  ०१ जिल्ह आहे.

·        १२ तालुके असलेले गडचिरोली व कोल्हापूर असे ०२ जिल्हे आहेत.

·        ११ तालुके असलेले सोलापूर, सातारा, बीड असे ०३ जिल्हे आहेत.

·        १0 तालुके असलेले लातूर आणि सांगली असे ०२ जिल्हे आहेत.

·        ९ तालुके असलेले और्नागाबाद, परभणी व रत्नागिरी असे ०३ जिल्हे आहेत.

·        ८ तालुके असलेले गोंदिया, जालना, उस्मानाबाद, पालघर, सिंधुदुर्ग, व वर्धा असे ०६ जिल्हे आहेत.

·        ७ तालुके असलेले ठाणे, अकोला व भंडारा असे ०३ जिल्हे आहेत.

·        ६ तालुके असलेले वाशीम व नंदुरबार असे ०२ जिल्हे आहेत.

·        ५ तालुके असलेले हिंगोली असे ०१ जिल्हे आहेत.

·        ४ तालुके असलेले धुळे असे ०१ जिल्हे आहेत.

·        ३ तालुके असलेले मुंबई उपनगर असे ०१ जिल्हे आहेत.

·        राज्यात एका जिल्ह्यात २ तालुके व 1 तालुके असणारा एकही जिल्हा नाही

·        मुंबई शहर जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही.

·        नांदेड व यवतमाळ जिल्हामध्ये सर्वात जास्त १६ तालुके असून मुंबई शहर  या जिल्हात एकही तालुका नाही.

·        मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये अंधेरी, बोरीवली आणि  कुर्ला असे ०३ नागरी तालुके आहेत.




 

महाराष्ट्र राज्य: सारख्या नावाची  तालुके:  


    जिल्हा व जिल्ह्यातील सारख्या नावाचे तालुके पुढीलप्रमाणे आहेत.पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यात खेड नावाचे तालुके आहेत.



    अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यात कर्जत नावाचे तालुके आहेत.




      यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब  नावाचे तालुके आहेत.




  वाशीम  आणि नाशिक  जिल्ह्यात मालेगाव  नावाचे तालुके आहेत.



   नाशिक  आणि अमरावती  जिल्ह्यात नांदगाव  नावाचे तालुके आहेत.




   वर्धा  आणि परभणी   जिल्ह्यात सेलू  नावाचे तालुके आहेत.




   वर्धा  आणि वाशिम  जिल्ह्यात कारंजा  नावाचे तालुके आहेत.




   पुणे  आणि बीड  जिल्ह्यात शिरूर  नावाचे तालुके आहेत.




चारही दिशेस असलेले शेवटचे तालुके: 

महाराष्ट्र राज्याच्या अतिपूर्वेकडील तालुका गडचिरोली जिल्हातील भामरागड, अतिदक्षिणेकडील तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, अतिपश्चिमेकडील तालुका पालघर जिल्ह्यातील पालघर आणि अतिउत्तरेकडील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुका आहे.



  सागरी किनारपट्टी लाभलेले तालुके: 

     महाराष्ट्रातील ३५८ तालुक्यांपैकी 28 तालुक्यांना सागरी किनारा लाभलेला आहे. त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू, पालघर आणि वसई हे ०४ तालुके, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, ठाणे, आणि कल्याण हे ०३ तालुके, मुंबई उपनगर जिल्यातील बोरीवली, अंधेरी आणि कुर्ला हे ०३ तालुके, रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, पेण, अलिबाग, रोहा, मुरुड, तळा, म्हासळा आणि श्रीवर्धन असे ०९ तालुके, रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी आणि राजापूर हे ०५ तालुके आणि सिधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी हे ०४ तालुके यांचा समावेश होतो.



स्थानिक स्वराज्य संस्था: 

    ग्रामीण स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्था असे दोन स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रकार पडतात. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या ग्रामीण स्वराज्य संस्था आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्यक्षेत्र ग्रामीण प्रदेश असते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील प्रशासनासाठी महाराष्ट्राने जिल्हास्तरावर जिल्हा परिषद, तालुका स्तरावर पंचायत समिती आणि गाव पातळीवरील ग्रामपंचायत किंवा ग्रामपरिषद या  त्रिस्तरीय रचनेचा स्वीकार केलेला आहे. महानगरपालिका,  नगरपरिषद, नगरपंचायत  आणि कटक मंडळे या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. राज्यातील शहरी भागाचा विकास करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने नागरविकासखाते विकसित केले असून, त्याद्वारे महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायती यांची स्थापना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील नगरपालिका अधिनियमानुसार लोकसंख्येवर आधारित शहरी भागाची विभागणी करतात.

३ लाखापेक्षा  पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरी क्षेत्रात महानगरपालिका

१ लाखापेक्षा  पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या लहान शहरी क्षेत्रात  ‘अ’ वर्ग नगरपरिषद

४० हजार  ते १ लाखापर्यंतच्या  लहान शहरी क्षेत्रात  ‘ब’ वर्ग नगरपरिषद

25  ते ४० हजार  लोकसंख्या असलेल्या लहान शहरी क्षेत्रात  ‘क’ वर्ग नगरपरिषद

१० हजार  ते 25 हजार लोकसंख्या असलेल्या क्षेत्रात नगर पंचायत



 

ग्रामीण स्वराज्य संस्था: 

    महाराष्ट्रात सध्यस्थितीत मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे एकूण ३४ जिल्हा परिषद अस्तित्वात आहे. महाराष्ट्रात एकूण ३५१  पंचायत समित्या किंवा ब्लॉक पंचायत आहेत. महाराष्ट्रात २८८१३  ग्रामपंचायती आहेत.


नागरी स्वराज्य संस्था: महानगरपालिका: 

    राज्यात सध्यस्थितीत 27 महानगरपालिका असून बृहन्मुंबई महानगरपालिका ही सर्वात मोठी महानगरपालिका आहे. कोंकण विभागात बृहन्मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, भिवंडी आणि  पनवेल अशा ०९ महानगरपालिका आहेत. नाशिक विभागात नाशिक, अहमदनगर, मालेगाव, धुळे, जळगाव अशा ०५ महानगरपालिका, पुणे विभागात पुणे, पिपरी-चिन्चवड, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर आणि कोल्हापूर महानगरपालिका या ०५ महानगरपालिका, औरंगाबाद विभागात औरंगाबाद,  परभणी, लातूर, नांदेड या ०४ महानगरपालिका, नागपूर विभागात नागपूर व चंद्रपूर या ०२ महानगरपालिका तसेच अमरावती विभागात अमरावती व अकोला ०२ महानगरपालिका आहेत.



      

        कोकण प्रशासकीय विभागात सर्वात जास्त ०९ महानगरपालिका असून सर्वात कमी महानगरपालिका अमरावती व नागपूर विभागात आहेत.

      महानगरपालिकांचे अ’ वर्ग, ‘ब’ वर्ग, ‘ क’ वर्ग’ वर्ग  आणि ‘ड’ वर्ग महानगरपालिका असे करण्यात येते. त्यानुसार राज्यात बृहन्मुंबई महानगरपालिका, भिवंडी-निजामपूर, नागपूर महानगरपालिका, पुणे महानगरपालिका या ०४ ‘अ’, वर्ग महानगरपालिका आहेत.



    ठाणे महानगरपालिका, अहमदनगर महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या ०४ ‘ब’ वर्ग महानगरपालिका आहेत.



    औरंगाबाद महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, , नवी-मुंबई महानगरपालिका,  कल्याण-डोंबिवली महानगरपालिका या ०४ ‘क’ वर्ग महानगरपालिका आहेत.




    अकोला महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका, लातूर शहर महानगरपालिका, नांदेड महानगरपालिका, परभणी महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका,  मीरा-भाईंदर महानगरपालिका,  उल्हासनगर महानगरपालिका, चंद्रपूर महानगरपालिका, धुळे महानगरपालिका, जळगाव महानगरपालिका, मालेगाव महानगरपालिका, कोल्हापूर महानगरपालिका, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका आणि सोलापूर महानगरपालिका या १५ महानगरपालिका ‘ड’ वर्ग महानगरपालिका आहेत.




नगरपरिषद आणि नगर पंचायत:

    महाराष्ट्रात राज्यात सद्यस्थितीत २३३ नगरपरिषदा  व १२६ नगरपंचायती आहेत.  नगर परिषदांचे वर्गीकरण ‘अ’, ‘ब’, व ‘क’ वर्ग नगरपरिषदा असे करण्यात येते. त्यामध्ये राज्यात ‘अ’ वर्ग नगरपरिषदा  १७, ‘ब’ वर्ग नगरपरिषदा  ७३ आणि ‘क’ वर्ग नगरपरिषदा  १४३ आहेत.

    औरंगाबाद विभागात नगरपरिषद  व नगरपंचायतीची संख्या  सर्वात जास्त ७५ असून कोकण विभागात सर्वात कमी ४३ इतकी आहे.


    महाराष्ट्र राज्यातील कटक मंडळे: 

    लष्कराची छावणी असलेल्या ठिकाणी कटक मंडळे स्थापन केली जातात. तेथील प्रशासन लष्कराच्या प्रशासकाद्वारे  बघितले जातात. सध्यस्थितीत भारतात असणाऱ्या ६२ कटक मंडळांपैकी महाराष्ट्रातील कटक मंडळांची संख्या ७ आहेत. अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर कॅंटोन्मेंट बोर्ड,  औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद कॅंटोन्मेंट बोर्ड,  पुणे जिल्ह्यात देहू रोड, खडकी आणि पुणे,  नाशिक जिल्ह्यात देवळाली व नागपूर जिल्ह्यात कामठी येथे कटक मंडळे आहेत.



अशाप्रकारे महाराष्ट्रातील प्रशासकीय रचनेमध्ये महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग, महाराष्ट्रातील जिल्हे, तालुके, ग्रामीण स्वराज्य संस्थ आणि नागरी स्वराज्य संस्था यांचा अभ्यास केला.