महाराष्ट्र राज्याचा बदलता नकाशा 

(The changing map of Maharashtra State)


            महाराष्ट्राचा भूगोल या विषयांतर्गत, महाराष्ट्र राज्याचा बदलता नकाशा या घटकामध्ये, आज आपण, बॉम्बे  प्रेसिडन्सी  म्हणजेच मुंबई इलाखा ते महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपर्यंतचा अभ्यास नकाशाच्या सहाय्याने करणार आहोत. इ.स.1947 मध्ये, भारत स्वतंत्र झाल्यानंतर, बॉम्बे प्रोव्हिन्स म्हणजेच मुंबई  प्रांत काही काळ अस्तित्वात होते, परंतु हि एक तात्पुरती व्यवस्था होती.  इ.स. १९५६ मध्ये, भाषेच्या आधारावर राज्यांच्या पुनर्निमितीस प्रारंभ झाल्यानंतर मुंबई प्रांताच्या सीमेत बदल झाला तसेच एका प्रांतातील प्रदेश दुसऱ्या प्रांतात हस्तांतरित झाल्यामुळे बरीच नवीन राज्ये तयार झाली शिवाय  अस्तित्वात असलेल्या प्रदेशाच्या सीमावर्ती भागातही बदल झाले. राजस्थान, कर्नाटक, केरळ ही नवीन राज्ये म्हणून उदयास आली तर महाराष्ट्र आणि गुजरात जुन्या मुंबई  प्रांतात राहिली. भाषिक राज्ये बनवण्याची प्रक्रिया पुढे चालूच राहिली कारण मुंबई सारखी काही राज्ये अद्याप द्विभाषिक होती. त्यानंतर द्विभाषिक राज्यांच्या विभाजनानंतर,  १ मे १९६० रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती  झाली.  

ब्रिटिश राजवट आणि महाराष्ट्र:

            मुंबईचे बेट ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीला इंग्लंडच्या राजाने भाडे तत्वावर दिले व इस्ट इंडिया कंपनीने १६८७ मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणजेच मुंबई इलाखा प्रस्थापित केला. १८१८ मध्ये इंग्रजांनी मराठ्यांना युद्धामध्ये पराभूत केले व पेशवे, गायकवाड, शिंदे व होळकर यांचे प्रदेश जिंकून घेतले. यातील बहुतांश प्रदेश मुबई इलाख्यात समाविष्ट करण्यात आला. १८३९ मध्ये ऐडेन व तसेच १८४३ मध्ये सिंध प्रांत इंग्रजांनी जिंकून घेतले व त्यांना मुंबई इलाख्यात समाविष्ट केले.

            पश्चिम भारतातील ब्रिटीश प्रदेश मुंबई इलाखा म्हणून ओळखला जात असे.  मुंबई इलाख्याचे एकूण क्षेत्रफळ 4,84,128  चौ. कि. मी.  होते.  मुंबई इलाख्यामधील कराची, लारकाना, सुक्कुर, थार, अप्पर सिंध फ्रंटीअर, अहमदाबाद, भरूच, खेडा, पंच महाल, सुरत, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, कानडा, अहमदनगर, खानदेश पूर्व, खानदेश पश्चिम, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, बेळगाव, विजापूर, धारवाड असे एकूण  25 जिल्हे  उत्तर, मध्य, दक्षिण आणि सिंध या ४ प्रशासकीय विभागाअंतर्गत एकत्र करण्यात आले होते. उत्तर प्रशासकीय विभागाचे मुंख्यालय अहमदाबाद, मध्य विभागाचे पुणे, दक्षिण विभागाचे बेलगाव आणि सिंध विभागाचे कराची येथे होते. मुंबई इलाख्यामध्ये अनेक लहान जागीर व राज्ये एकत्रित केली आणि त्यांना काठीवाड़, रेवकंठा आणि माहिकांठा एजन्सी किंवा दक्षिणेकडील मराठा जागीर यासारख्या मोठ्या संस्था बनवल्या.  



मुंबई प्रांत: (Mumbai province)

            १९३५ च्या भारत सरकार कायद्याद्वारे मुंबई इलाख्यची पुनर्रचना करण्यात आली व मुबई प्रांत स्थापित करण्यात आला. सिंध प्रांत व येडेन मुबई इलाख्यातून वेगळे करण्यात आले. मुंबई इलाख्याचा उर्वरित प्रदेश ब्रिटीश जिल्हे आणि संस्थानामध्ये एकत्रित करण्यात आला. मुबई प्रांतामध्ये मुम्बई, अहमदाबाद, खेडा, पंचमहाल, सुरत, पश्चिम खानदेश, पूर्व खानदेश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, बेळगाव, विजापूर, धारवाड, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, कानडा आणि भरूच हे २० ब्रिटीश जिल्हे आणि वेस्टर्न इंडियन स्टेट एजन्सी, गुजरात स्टेट एजन्सी व डेक्कन स्टेट  एजन्सी  यांचा समावेश होता. ई.स. 1947 मध्ये, भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या विभाजनानंतर सिंध प्रांत पाकिस्तानचा भाग बनला. सत्ता हस्तांतरणाच्या वेळी बहुतेक संस्थाने स्वेच्छेने भारतात सामील झाली. दशकानंतर, भारतातील संस्थानांचे आकार आणि महत्व या आधारावर ‘ब’ आणि ‘क’ वर्ग राज्ये असे गट तयार करण्यात आले  आणि १९५६ मध्ये भाषिक पुनर्रचनांसह एकतर भाषिक राज्यात विलीन झाली किंवा इतर राज्यात हस्तातरीत करण्यात आली.

  


             

 

मुंबई, सौराष्ट्र आणि कच्छ राज्य:

            1947 मध्ये, सौराष्ट्र आणि कच्छ या दोन राज्यांनी मुंबई प्रांताची उतरेकडील सीमा जोडल्यामुळे  मुंबई प्रांताचा आकार कमी झाला. मुंबई, सौराष्ट्र आणि कच्छ ही राज्ये तयार झाली.

मुंबई  राज्य:

            पूर्वीच्या मुंबई प्रांतातील २० जिल्हे, गुजरात आणि डेक्कन स्टेट एजन्सी,  पूर्वीच्या वेस्ट इंडिया स्टेट एजन्सी मधील साबरकांठा एजन्सी, बडोदा राज्य, पूर्वीच्या सिरोही स्टेट मधील काही तालुके आणि राजस्थान, सौराष्ट्र  आणि हैद्राबाद मधील काही गावे मुंबई राज्यात हस्तांतरित करण्यात आली त्याचबरोबर मुंबई राज्यातील काही गावे सौराष्ट्र आणि राजस्थान राज्यात हस्तांतरित करण्यात आली आणि मुंबई राज्य निर्माण झाले.

सौराष्ट्र राज्य:

            साबरकांठा एजन्सी  वगळता पूर्वीची वेस्टर्न इंडिया एजन्सी, पूर्वीच्या इंडिया स्टेट मधील  राधान्पूर, विजयनगर आणि मोरवी राज्यातील अधोही महाल तसेच मुंबई राज्यातील काही गावे सौराष्ट्र राज्यात हस्तांतरित केली गेली आणि सौराष्ट्र राज्य निर्माण झाले.

कच्छ राज्य:

            पूर्वीचे कच्छ राज्य आणि मोरवी राज्याचे अधोई महाल यांचा समावेश होवून कच्छ राज्य निर्माण झाले.  

            संस्थानाच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेत सौराष्ट्र आणि कच्छ हि दोन  राज्ये निर्माण झाली. शिवाय  मुंबई राज्यात बनासकांठा, साबरकांठा, मेहसाना, बडोदा, अमरेली, डांग, दक्षिण सातारा (सध्या सांगली) आणि कोल्हापूर असे ०८ जिल्हे, सौराष्ट्र राज्यात हलार, मध्य सौराष्ट्र, झेलावाड, गोहिलवाड आणि सोरथ हे ५ जिल्हे आणि कच्छ राज्यात कच्छ  हा ०१ जिल्हा असे एकूण १४ नवीन जिल्हे  निर्माण झाले.

            1951 मध्ये, मुंबई राज्यात एकूण 28 जिल्हे होते. त्यामध्ये बृहद मुंबई हा एक जिल्हा, सध्याच्या गुजरात राज्यातील बनासकांठा, साबरकांठा, मेहसाना, अहमदाबाद, खेडा, पंचमहाल, बडोदा, भरूच, सुरत, अमरेली आणि डांग हे 11  जिल्हे, सध्याच्या महाराष्ट्र राज्यातील पूर्व खानदेश, पश्चिम खानदेश, नाशिक, अहमदनगर, पुणे,  दक्षिण सातारा, उत्तर सातारा, कोल्हापूर, सोलापूर, ठाणे, कुलाबा आणि रत्नागिरी असे १२ जिल्हे आणि सध्याच्या कर्नाटक जिल्ह्यातील कानडा, धारवाड, बेळगाव आणि विजापूर या ०४ जिल्ह्यांचा समावेश होता. 



द्विभाषिक मुंबई राज्य: (१९५६)

          भाषेच्या आधारावर राज्यांची पुननिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान, सौराष्ट्र आणि कच्छ ही राज्ये मुंबईत विलीन झाली. त्याचप्रमाणे मध्य प्रांतातील  नागपूर, भंडारा, चांदा, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलाडाना हे ०८ जिल्हे आणि निजाम प्रदेशाच्या विलीनीकरणानंतर हैदराबाद राज्यातील  औरंगाबाद, बीड,  परभणी, उस्मानाबाद आणि नांदेड हे ०५ जिल्हे असे एकूण १३ नवीन जिल्हे द्विभाषिक मुंबई राज्यात जोडण्यात आले. त्याचबरोबर मुंबई राज्यातील बेळगाव, धारवाड, विजापूर आणि उत्तर कानडा हे ०४ जिल्हे कर्नाटक राज्यास जोडण्यात आले.




महाराष्ट्र राज्याची निर्मिती: 

          भाषेच्या आधारावर स्वत: ला वेगळी राज्ये हव्या असलेल्या मराठी आणि गुजराती या दोन भाषिक गटाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिकार झाला त्यामुळे द्विभाषिक मुंबई राज्य फार काळ टिकू शकले नाही आणि 1 मे १९६० रोजी महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये अस्तित्त्वात आली. 1 मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्यात कोंकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर हे ०४ प्रशासकीय विभाग होते तसेच आणि २६ जिल्हे होते. 

 


 

सध्याचे महाराष्ट्र राज्य:   

सध्याच्या महाराष्ट्र राज्याचा अक्षवृत्तीय विस्तार १५ अंश ४४ मिनिटे उत्तर ते २२ अंश ६ मिनिटे  उत्तर अक्षांश आहे. रेखावृत्तीय विस्तार ७२ अंश ३६ मिनिटे पूर्व ते ८० अंश ५४ मिनिटे पूर्व रेखांश असा आहे.



          महाराष्ट्र राज्याच्या वायव्येस गुजरात राज्य तसेच दमन-दिव, दादरा-नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश, उत्तरेस मध्यप्रदेश, पूर्वेस छत्तीसगड, आग्नेयेस तेलंगाना, दक्षिणेस कर्नाटक व नैऋत्येस गोवा राज्याच्या सीमा आहेत.



महाराष्ट्र राज्याचे एकूण भोगोलिक क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ. कि. मी. इतके असून भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी  9.36  टक्के क्षेत्र महाराष्ट्र राज्याने व्यापले आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत  महाराष्ट्र राज्याचा क्षेत्रफळाच्या बाबतीत राजस्थान आणि मध्यप्रदेश नंतर देशात तिसरा क्रमांक लागतो.



  २०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात सध्या, मुंबई म्हणजेच कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबादअमरावती व नागपूर असे सहा प्रशासकीय विभाग, ३६ जिल्हे आणि ३५८ तालुके आहेत.



याशिवाय महाराष्ट्रात ३४ जिल्हापरिषद, ३५१ पंचायत समिती आणि २८८१३ ग्रामपंचायती इत्यादी ग्रामीण स्वराज्य संस्था आहेत. नागरी स्वराज्य संस्थाचा विचार करता, महाराष्ट्र राज्यात एकूण  27 महानगरपालिका, २३३ नगर परिषद, १२६ नगर पंचायत आणि ०७ कटक मंडळे आहेत.  त्याचबरोबर वस्ती असलेली ४०,९५९ आणि वस्ती नसलेली २,७०६ अशी एकूण ४३,६६५ खेडी आहेत. याशिवायमहाराष्ट्र राज्यात एकूण ५३४ शहरे आणि १७ शहर  संकुले असून एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली ४४ शहरे आहेत. 



अशाप्रकारे, महाराष्ट्र राज्याच्या मुंबई इलाख्यापासून  ते सध्याच्या महाराष्ट्र राज्याच्या बदलत्या नकाशाचा अभ्यास केला.