माण नदी खोऱ्याची (Man River Basin) लोकसंख्या, लोकसंख्येतील दशवार्षिक बदल, लोकसंख्या वितरण, लिंगगुणोत्तर, ग्रामीण -नागरी लोकसंख्या व्यावसायिक संरचना या लोकसंख्या विषयक वैशिष्ठ्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यासाठी नदी खोऱ्यातील तालुकानिहाय, गावनिहाय नकाशा तयार करून सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्याच्या १९६१ ते २०११ या कालावधीतील जनगणना अहवालातून माहिती संकलीत करण्यात आली. 

माण नदी खोऱ्यातील लोकसंख्येची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. 

१. लोकसंख्या: (Population) 

माण नदी खोऱ्याची एकूण लोकसंख्या ९,०६,७७४ इतकी असून पुरुष व स्त्री लोकसंख्या अनुक्रमे ४,६३,१३६ व ४,४३,६३८ इतकी आहे. 

२. लोकसंख्या वाढ: (Population Growth)

२०११ च्या जनगणनेनुसार, भारत व महाराष्ट्राच्या लोकसंख्येतील दशवार्षिक बदल हा अनुक्रमे १७.६४ व १६.०१ टक्के असून माण नदी खोऱ्यातील लोकसंख्येतील दशवार्षिक बदल हा १४.७५ टक्के इतका आहे. माण नदी खोऱ्यात लोकसंख्येतील दशवार्षिक बदल हा १९८१-९१ या दशकात सर्वात जास्त (२७.५० टक्के) असून २००१-२०११ या दशकात सर्वात कमी (१४.७५ टक्के ) आहे.

३. लोकसंख्येचे वितरण: (Population Distribution)

माण नदी खोऱ्यातील 1961 ते 2011 या कालावधीतील लोकसंख्येच्या आकडेवारीच्या आधारे अभ्यास करून खालील निकषाच्या आधारे लोकसंख्येचे वितरण दर्शिविण्यात आले. खालील चार निकष पूर्ण करतील अशा  वसाहतींना दाट लोकसंख्येच्या वसाहती व मध्यम  लोकसंख्येच्या वसाहती म्हणून निश्चित करण्यात आल्या. 

दाट लोकसंख्येच्या वसाहतीचे निकष: 
  • १९६१-२०११ या कालावधीत सातत्याने दर चौ.कि. मी.ला १०० लोकसंख्येची घनता असलेल्या वसाहती
  • २०११ मध्ये दर चौ. कि. मी.ला ३०० लोकसंख्या असलेल्या वसाहती
  • १९६१-२०११ या कालावधीत सातत्याने ४००० लोकसंख्या असलेल्या वसाहती 
  • २०११ मध्ये ८००० पेक्षा जास्त  लोकसंख्या असलेल्या वसाहती 

मध्यम  लोकसंख्येच्या वसाहतीचे निकष: 
  • १९६१-२०११ या कालावधीत सातत्याने दर चौ.कि. मी.ला ५० लोकसंख्येची घनता असलेल्या वसाहती
  • २०११ मध्ये दर चौ.कि. मी.ला १५० लोकसंख्या असलेल्या वसाहती
  • १९६१-२०११ या कालावधीत सातत्याने २००० लोकसंख्या असलेल्या वसाहती 
  • २०११ मध्ये ४००० पेक्षा जास्त  लोकसंख्या असलेल्या वसाहती
वरील निकषानुसार, दहिवडी, दिघंची, जत  व सांगोले या वसाहतीमध्ये दाट  लोकसंख्या आढळते. अकोला, आलेगाव, आंधळगाव, आटपाडी, बीदाल, चोपडी, एखतपूर ,घेरडी, गोंदवले बु., हतीद, जवळा, कडलस, कलेढोण, करगणी, कासेगाव, खर्डी, कोला, लक्ष्मी दहिवडी, म्हसवड, नागज, नंदेश्वर, नजरे, नेलकरंजी, पाचेगाव बु., पळशी, शेगाव, शेटफळे, सोनंद, तावशी, वाडेगाव, वाळेखिंडी या वसाहतीमध्ये मध्यम लोकसंख्या आढळते. 

Man River Basin: Population Distribution

Man  River Basin: Population Distribution 

४. लिंग गुणोत्तर: (Sex Ratio) 

दर हजारी पुरुषामागे असलेले स्त्रियांचे प्रमाण म्हणजे लिंगगुणोत्तर होय. लिंगगुणोत्तर काढण्यासाठी खालील सूत्राचा अवलंब करतात. 
लिंगगुणोत्तर= स्त्री लोकसंख्या / पुरुष लोकसंख्या * १०००
माण  नदी खोऱ्यात पुरुष लॊकसंख्येचे प्रमाण स्त्री लोकसंख्येपेक्षा जास्त असलेले दिसून येते. लिंगगुणोत्तराचे प्रमाण माण नदी खोऱ्यात १९७१ मध्ये सर्वात जास्त (९६९) होते तर २०११ मध्ये सर्वात कमी (९५८) होते. 

५. ग्रामीण -नागरी लोकसंख्या : (Rural-Urban Population)

माण  नदी खोऱ्यात एकूण ३४४ ग्रामीण वसाहती व  ०२ शहरांचा समावेश होतो. माण  नदी खोऱ्यात  एकूण लॊकसंख्येपैकी ९३.५५ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात निवास करते. 

६.व्यावसायिक संरचना: (Occupational Structure)

 माण नदी खोऱ्यामध्ये कार्यकारी लोकसंख्येचे प्रमाण ४६. ८३ टक्के आहे. शेतकरी व शेतमजुरांचे प्रमाण अनुक्रमे ४८. ०७ टक्के व ३०. ६५ टक्के इतके आहे. घरगुती व्यवसायामध्ये गुंतलेल्याचे प्रमाण २. ३९ टक्के असून इतर व्यवसाय करणाऱ्यांचे प्रमाण १८. ९० टक्के आहे.

अधिक माहितीसाठी वाचा: A Study on Population Growth of Man River Basin in Maharashtra