माण  नदी खोरे: स्थान, विस्तार  सीमा (Man River Basin: Location, Size and Boundaries)

प्रस्तावना:   (Introduction)          

                माण  नदीचे खोरे 'माणदेश'  म्हणून   ओळखले जाते. माण  नदीचे खोरे महिमानगड रांगा  व मुख्य महादेव रांग यांच्या दरम्यान आहे. नदी खोऱ्याची  भूरचना येरळा नदी खोऱ्यासारखीच (Yerala River Basin) आहे परंतु भूदृश्य खडकाळ व ओसाड आहे.
              माण  नदी भीमा नदीची  उजव्या बाजूने वाहणारी  उपनदी असून ती सातारा जिल्ह्यातील माण  तालुक्यात फलटणच्या रांगेत उगम पावते. पुढे ती सातारा जिल्ह्याच्यपूर्वेकडून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि पंढरपूर तालुक्यातून  वाहत जाऊन पंढरपूरच्या  १५ कि.मी. आधी सरकोली  गावाजवळ भीमा नदीस मिळते.

स्थान, विस्तार आणि सीमा : (Location, Size and Boundaries) 

             माण  नदीचे खोरे १७ अंश ०० मिनिट  ते १७ अंश ५१ मिनिट  उत्तर अक्षांश व ७४ अंश २२ मिनिट ते ७५ अंश ३० मिनिट पूर्व रेखांशाच्या दरम्यान आहे.  माण  नदीचे खोरे दक्षिण महाराष्ट्रातील सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यात आहे. सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील ७ तालुक्यामध्ये नदीचे खोरे पसरलेले आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील माण  तालुका, सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याचा उत्तर भाग, जत आणि कवठे -महांकाळ तालुके, तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोले, मंगळवेढा तालुक्याचा पश्चिम भाग व पंढरपूर तालुक्यातील काही गावे यांचा समावेश होतो.
             माण  नदीची  एकूण लांबी ११६ कि.मी. आहे. नदी खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ ४७५७. ४७ चौ .कि.मी. असून  पूर्व -पश्चिम व उत्तर-दक्षिण लांबी अनुक्रमे ११६.८ व ९१.२ कि. मी. आहे. माण नदीच्या उत्तरेस सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका व सोलापूर जिल्ह्यातील माढा व माळशिरस तालुके, पश्चिमेस सांगली जिल्ह्यातील खानापूर व खटाव  तालुका, पूर्वेस सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ व द. सोलापूर तालुके तसेच दक्षिणेस कर्नाटक राज्यातील विजापूर तालुका यांच्या सीमा आहेत.

नकाशा : माण  नदी खोरे - प्रशासकीय विभाग (Man River Basin: Administrative Division)  


Man River Basin: Location, Size & Boundaries



Source: Shikalgar, R., 2017, 'Drought Assessment and Monitoring Using Remote Sensing Data in Man River Basin', Maharashtra State, UGC Minor Research Project, Mar-2017